जागतिक महिला दिन आणि आपण
जागतिक महिला दिन नुकताच साजरा झाला.
त्यानिमित्ताने मला क्लिनिकमध्ये आलेले महिलांशी संबंधित अनुभव आज मी येथे मांडते आहे.
थोड्या दिवसात अजून एक साधारण त्याच वयाची पेशंट दातदुखी घेऊन आली. तपासून झाल्यावर ह्या पेशंटलाही दात वाचवण्याच्या इलाजाबद्दल मी समजावलं पेशंटलाही दात वाचवण्याच्ं महत्त्व पटलं
“पण मी घर काम करते तर टप्प्याटप्प्याने ट्रीटमेंटचे पैसे दिले तर चालतील ना ? मी पगाराचे पैसे साठवून हळू हळू ट्रीटमेंट करून घेईन” असं म्हणून त्या बाईने ट्रीटमेंट चालू केली सुद्धा…
पण मला मात्र राहून राहून असं वाटलं की फक्त कमवत नाही म्हणून स्वतःच्या तब्येतीसाठी एखादी ट्रीटमेंट निवडण्याचा हक्क बाईला नसावा का?
दुसरा अनुभव एक 16 वर्षांच्या मुलीचा…
दात वाकडे तिकडे असल्याने दातांना तारा लावून सरळ करण्याची ऑर्थो (orthodontics)ट्रीटमेंट तिची चालू होती. या ट्रीटमेंटसाठी महिन्यातून एकदा असे बरेच महिने यावं लागतं. यासाठी तिचे वडील तिला नियमितपणे घेऊन यायचे . त्या मुलीच्या डाव्या व उजव्या दोन्ही बाजूची एक-एक दाढ किडलेली, सुजलेली होती. दोन्ही बाजूंनी त्या मुलीला धड जेवता येत नसणार. तिला नीट जेवता यावं, म्हणून त्या दाढ़ांचीसुद्धा ट्रीटमेंट करून घ्यायची गरज आहे हे आम्ही दर अपॉइंटमेंटला तिच्या वडिलांना त्यांना समजावून सांगायचो ; पण तिची ऑर्थो ट्रीटमेंट नियमितपणे , न चुकता , आगाऊ पैसे भरून करून घेणाऱ्या तिच्या वडिलांनी तिच्या दुखऱ्या दातांकडे कधीच लक्ष दिलं नाही;
कारण त्यांच्या मते, ती मुलगी होती…त्यामुळे तिचे दात सरळ असणे, तिने चांगलं दिसणं हे तिचं लग्न ठरवण्यासाठी जास्त गरजेचं होतं, तिला जेवताना होणारा त्रास मात्र तेवढा महत्त्वाचा नव्हता…
मुलीचं लग्न ठरणं किंवा तिने चांगलं दिसणं हे तिला रोज धड जेवता येणं, किंवा तिचं दुखणं,त्रास यापेक्षाही महत्वाचं का असावं?
जागतिक महिला दिन साजरा करताना बऱ्याच ठिकाणी महिलांसाठी खाद्यपदार्थ, शॉपिंग या गोष्टींवर ऑफर्स देण्यात आल्या होत्या. पण माझ्या मते महिलांना थोडंसं निर्णय स्वातंत्र्य आणि स्वतःच्या तब्येतीला जपण्याचा, प्राधान्य देण्याचा अधिकार मिळाला तर खऱ्या अर्थाने हा दिवस साजरा होईल.

0 Comments