मदतनीसांबद्दल कृतज्ञता

by | Mar 26, 2022

..

 

सात ते 13 मार्च आठवडा अमेरिकन डेंटल असोसिएशन “डेंटल असिस्टंट रेकॉग्निशन विक” म्हणून साजरा करते. दातांच्या दवाखान्यात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.  भारतामध्ये असा कुठला दिवस किंवा आठवडा साजरा केला जात असल्याचे ऐकिवात नाही ; पण अमेरिकेतल्या या पद्धती बद्दल वाचल्यानंतर मलाही मागच्या कित्येक वर्षात मी काम केलेल्या वेगवेगळ्या दवाखान्यातील वेगवेगळ्या मदतनिसांची आठवण झाली.
साधारण 16 ते 20 वयोगटातल्या बऱ्याच मुली कॉलेजचं शिक्षण करता करता पार्ट टाईम मदतनीसाची नोकरी करतात. काही लग्न झालेल्या बायकासुद्धा घरच्या मिळकतीला हातभार म्हणून ही नोकरी करतात.

मदतनीस म्हटलं की सर्वात आधी आठवण होते ती दोन जणांची ; एक म्हणजे बाई आणि दुसरे भाऊ .

त्यांची खरी नावे माझ्या लक्षात नाहीत पण त्यांना क्लिनिक मध्ये याच नावाने बोलावलं जायचं .

एखाद्या क्लिनिक मध्ये बरीच वर्षे काम केल्यावर या मदतनीसांना dentistry मधलं खूप काही कळायला लागतं. डॉक्टरांच्या एका इशाऱ्यावरून त्यांना आता काय लागणार आहे, कुठलं इन्स्ट्रुमेंट किंवा मटेरियल लागणार आहे ; हे त्यांना पटकन ओळखू यायला लागतं. पण आपल्याला बरंच काही यायला लागलं; म्हणजे आपण डॉक्टर पेक्षा पण हुशार झालो असंही काही अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या असिस्टंटना वाटतं. अशा असिस्टंटना मग नुकत्याच कॉलेजमधून बाहेर पडलेल्या नवीन डेंटिस्टना तुच्छ लेखतानापण मी पाहिले आहे

पण बाई आणि भाऊ हे दोन मदतनीस ज्यांचा सहवास मला २ वेगवेगळ्या क्लिनिक मध्ये लाभला;

त्यांच्याबद्दलची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ; त्यांनी त्यांच्या क्लिनिक मध्ये जवळपास 20 वर्षांपेक्षा जास्त वर्षे मदतनीस म्हणून काम केलेलं होतं. त्यांचं वय सुद्धा माझ्यापेक्षा जवळपास दुप्पट होतं. शिक्षण सुद्धा जेमतेम झालेलं . पण त्यांनी नव्या डॉक्टरांना कधीच ‘आम्हाला तुमच्या पेक्षा जास्त येतं’ असं जाणवू दिलं नाही. कायम अदबीने , आदराने बोलणं, (वयाने दुप्पट असूनसुद्धा) आणि कामाचा उरक आणि उत्साह या गोष्टी खरंच वाखणाण्या सारख्या होत्या.

 

एका क्लिनिक मधल्या रिसेप्शनिस्ट अंजलीताई, आणि  मी वर उल्लेख केलेल्या बाई या दोघींची हातोटी अशी ; की बाहेर आपल्या अपॉइंटमेंटची   वाट बघणाऱ्या पेशंटला त्यांनी कधीच वाट बघण्याचा कंटाळा येऊ दिला नाही. त्यांना गप्पांमध्ये गुंतवून होणाऱ्या उशिराची तक्रार करण्याची संधी त्या देत नसत.

 

 

आणि हा लेख जिच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे अशी माझी एक मदतनीस म्हणजे व्हेनसी. मध्ये तर त्यांनी व्यवस्थित मदत तर कायम केलीच. पण मी प्रेग्नंट असताना त्यांनी अक्षरशः मोठ्या बहिणीसारखी माझी काळजी घेतली. मला त्रास होत असताना धीर देणं , मला हवा नको ते आणून देणं ,माझ्यासाठी रिक्षा बस थांबवणं आणि अशी भरपूर मदत त्यांनी केली. हा  सर्व त्यांच्या नोकरीचा भाग नव्हता पण त्यांच्या त्या काळातल्या या प्रेमळ आधराबद्दल मी कायम त्यांची ऋणी राहीन.

 

असिस्टंटचे वाईट अनुभव आलेच नाहीत असे नाही पण या लेखात मी मला आतापर्यंत लाभलेल्या सर्व चांगल्या असिस्टंटसचे मी त्यांच्या मदती बद्दल आभार  मानते …..

 

0 Comments