.आज क्लिनिक मध्ये आल्यावर माझी असिस्टेंट अश्विनीचा चेहरा जरा उतरलेला दिसला म्हणून चौकशी केली, “काय गं सकाळी सकाळी का चेहरा असा का दिसतोय तुझा ?”
“मॅडम, दाढ दुखतेय माझी रात्रीपासून “
“अगं हे म्हणजे दिव्याखाली अंधार असल्या सारखं झालं. दाताच्या दवाखान्यात काम करत असूनसुद्धा दातदुखी… कालच नाही का सांगायचंस , किंवा फोन करायचास …”
“ गोळी घेतली हो मॅडम, पण काहीच आराम नाही” १८ वर्षांची अश्विनी अगदी रडकुंडीला येऊन म्हणाली
“बरं …ये, चेक करूया आपण “
“ अगं काही नाही…. अक्कलदाढ येतेय तुला म्हणून दुखतंय.. औषधं देते मी… पडेल आराम तुला “चेक केल्यावर मी तिला धीर देत म्हटलं. पण तिच्या चेहऱ्यावर काळजी अजून ही दिसतच होती.
“ मॅडम, काढावी लागेल का हो?”
“का गं? असं का विचारतेस?”
“नाही हो मॅडम .. इथे क्लिनिक मध्ये बघते ना.. बऱ्याचदा तुम्ही अक्कलदाढ काढायचा सल्ला देता ते…”
“ तुला अजून तरी नाही लागणार काढायला अक्कलदाढ . एकतर तुझी दाढ नुकतीच येते आहे आणि तिला यायला पुरेशी जागा सुद्धा आहे .“
“म्हणजे फक्त जागा नसली की च दुखते का दाढ? आणि एवढ्या लोकांना का होतो हो त्रास हा अक्कलदाढेचा ?” मी दिलेली गोळी घेत अश्विनीने विचारलं
“
“यायला जागा नसणे हे अक्कल दाढ दुखण्याचे एक कारण आहे हे अजूनही कारणे असतात आणि अक्कलदाढेचा त्रास सध्या का वाढला आहे याचे उत्तर जरा मोठं आहे”
“सांगा ना मॅडम ,अजून पेशंट यायला वेळ आहे”
“अगं तू अपेंडिक्स बद्दल ऐकलं आहेस का?””हो मॅडम , माझ्या एका भावाचं झालंय ना ऑपरेशन… पण त्याचा इथे काय संबंध?”
“अगं अपेंडिक्स खूप पूर्वी माणसाच्या पचनासाठी महत्त्वाचा अवयव होता, पण आता त्याची गरज संपल्यामुळे तो अगदी छोटा होऊन गेला आहे; पण कधी तरी त्याला इन्फेक्शन झालं, तर मात्र तो काढून टाकावा लागतो.
तसंच अक्कलदाढेचं सुद्धा आहे. आपल्या तोंडात अन्न चावण्यासाठी दाढा खूप महत्त्वाच्या असतात. पूर्वी अक्कलदाढ मिळून प्रत्येक जबड्यात सहा दाढा असत. कारण तेव्हा हा माणसाच्या जेवणात खूप कडक व कच्चे पदार्थ असायचे व ते चावण्यासाठी एवढ्या दाढाची गरज होती. पण आता आपलं जेवण खूप बदललं आहे. आपण खूप मऊ व शिजवलेले पदार्थ खातो, ते चावण्यासाठी एवढ्या दाढ़ांची आता गरज उरली नाही. त्यामुळे आता माणसांचे जबडे आकाराने छोटी होऊ लागले आहेत, त्यामुळे सगळ्यात शेवटी म्हणजे अठराव्या वर्षी येणाऱ्या अक्कल दाढेला यायला जागा कमी उरते. मग ही दाढ वाकडीतिकडी किंवा अगदी गालाच्या दिशेने येणे अशा गोष्टी घडतात.”
” पण मग ती दुखते नक्की कशामुळे?”
” बघ , आता नवीन येणारी दाढ यायला जोर करते, त्यामूळे दुखू शकते.किंवा दाढ अर्धवट बाहेर आली असेल तरी आसपासच्या हिरडीत इन्फेक्शन होऊन दाढ दुखते किंवा अगदी गालाच्या दिशेने आलेली दाढ गालाला जखम करते आणि त्रास होतो”
” बापरे! म्हणजे बरेच प्रकार आहेत एक अक्कलदाढ दुखण्याचे” अश्विनी हसत म्हणाली
” हो पण तिची अपेंडिक्सशी तुलना अशासाठी केली, कारण अपेंडिक्स सारखीच अक्कलदाढ सुद्धा एक निरुपयोगी अवयव आहे त्यामुळे बऱ्याचदा त्रासदायक अक्कल दाढ काढूनच टाकावी लागते.”
तेवढ्यात बाहेर एक पेशंट येउन बसले त्यामुळे मी आवरतं घेत म्हटलं,
“आणि हो… अजून थोडं बाकी आहे हे अक्कल दाढ पुराण त्याबद्दल नंतर केव्हातरी “

0 Comments