प्रकरण अंगावर शेकणे

by | Oct 6, 2021

प्रकरण अंगावर शेकणे हा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकला असेल , पण याचा दातांशी काय संबंध? आता पुढच्या गोष्टीत आपल्याला कळेलच .. . या गोष्टीतली पात्रे जरी काल्पनिक असली तरी , असे पेशंटस् डेन्टल क्लिनिक मध्ये बऱ्याचदा येतात याबद्दल सर्वच डेंटिस्टस् सहमत होतील.

त्यादिवशी सकाळी आठ वाजताच दाराची बेल वाजली. आमच्याकडे कामाला येणाऱ्या चंद्रभागा मावशी नेहमी ९ ला येतात , त्याच लवकर आल्यात असं समजून मी दार उघडलं . दारात मावशी होत्याच पण एकट्या नव्हत्या , त्यांच्यासोबत गाल हाताने पकडून ठेवलेली त्रस्त चेहऱ्याची साधारण तिशीतली एक मुलगी सुद्धा होती.
मी काही विचारण्याच्या आतच स्वभावाप्रमाणे मावशींची बडबड सुरू झाली ” बाय , ही आमच्या शेजारची सुषमा, रातभर दाताच्या दुखण्याने झोपलेली नाय , अनी आज सकाळपासून त्वांड पन सुजलंय , लई दुखते तिला. म्हणून मग दवाखाना उघडण्याची वाट नाय बघितली हिला घरीच घेऊन आलो . बाय तुला त्रास दिला “

“अहो त्रास कसला त्यात?” सुषमा ची अवस्था बघून तिला म्हटलं ,” दवाखान्यात तर तपासावंच लागेल, नंतर या तिथे , पण सध्यापुरती दुख ण्यासाठी गोळी देते. काही खाल्लं आहेस का ग ?” सुषमाचं रडवेलं हळू आवा जातलं उत्तर आलं “नाही”
” जरासं दूध वगैरे पिऊन गोळी घेऊन टाक ” असं म्हणून मी तिला एक गोळी दिली .
क्लिनिक मध्ये गेल्यावर सुषमा आणि मावशी आलेल्याच होत्या .सुषमाचा चेहरा आता जरा बरा दिसत होता .
सुषमाचं चेकअप केलं . तिच्या तोंडातल्या एका किडलेल्या दाढेमुळे तिला एवढं दुखत होतं आणि सूज पण आली होती.
” काय गं, दाढ तर बरीच खराब आहे . कधी पासून दुखतेय दाढ ?शेकलंस की काय गरम पाण्याने ?
“अधूनमधून दुखायची दाढ , काल तर लईच दुखत होती , कामंच सुचेना ,मग माझी मैत्रीण म्हणाली ,’शेक , बरं वाटेल.’ म्हणून शेकलं रात्री .” इति सुषमा ..
“अगं , आपले पाय ,पाठ ,कंबर दुखते ;तेव्हा गरम शेकण्याने बरं वाटतं ; तोच नियम तू दातांनाही लावलास आणि त्यामुळे ही एवढी मोठी सूज आलीये. आता आधी सूज कमी करायची औषधे घ्यावी लागतील , मगच इलाज करता येईल .”
” आपली पाठ किंवा कंबर दुखते, तेव्हा तिचे स्नायू अति श्रम किंवा चुकीच्या ताणामुळे दुखतात , गरम शेकण्यामुळे तिथे रक्तपुरवठा वाढतो, तिथली सूज ओसरून, दुखणं कमी व्हायला मदत होते.

पण दाताचं दुखणं असतं एक प्रकारचं इन्फेक्शन किंवा संसर्ग , त्याला गरम शेक दिला तर ऊब मिळाल्यामुळे त्यातले जंतु वेगाने वाढतात आणि तिथली सूज ओसारण्याऐवजी वाढते, पसरते.”

सुषमाला ” आणि हो,तिथे अजिबात गर्मी लागू देऊ नकोस, नाहीतर सूज वाढेल” अशी सूचना देऊन पाठवलं.

तर मंडळी,दातांच्या दुखण्याला विशेषतः इन्फेक्शन ला गरम शेक देण्याची चूक बरेच जण करतात आणि स्वतःचा त्रास वाढवून घेतात आणि शब्दशः प्रकरण अंगावर शेकतं .

तात्पर्य :- दातांच्या दुखण्यासाठि डेंटिस्टचा सल्ला घ्यावा , व त्यानुसारच उपाय करावेत . त्यांच्या सल्ल्याशिवाय केलेल्या उपचारांनी कधी कधी त्रास वाढू शकतो.

0 Comments