उतावळा पेशंट ……

by | Apr 8, 2022

उतावळा पेशंट

आज-काल इन्स्टंट हा जमाना आहे…
इन्स्टंट फूड ,त्वरित कर्ज, काही मिनिटात घरपोच वस्तूंची डिलिव्हरी हे सगळं सध्या शक्य आहे; त्यामुळे काही पेशंटना असं वाटतं की, दातांची ट्रीटमेंट सुद्धा अशी चुटकीसरशी होऊ शकते .
पण दातांच्या दवाखान्यात दातांच्या ट्रीटमेंटस पैकी खूप कमी ट्रीटमेंट अशा असतात या पटकन होतात. बहुतेक बऱ्याच दातांची ट्रीटमेंटना वेळ लागतो,
उदाहरणार्थ- दाताचे रुट कनाल अर्थात दात वाचवण्याचा इलाज बहुतेक करून दोन अपॉइंटमेंट लागतो कारण दातातील सूज, इन्फेक्शन पूर्णपणे गेल्याशिवाय रूट कनाल संपवता येत नाही .
तीच गोष्ट दात बसवणे बाबत लागू पडते. दातांचे माप घेतल्यानंतर नकली दात म्हणजे कवळी किंवा फिक्स दात जे काही असेल ते लॅब मधून बनवून येईपर्यंत थांबावे लागते.
पण दातांच्या काही ठराविक ट्रीटमेंटसच अशा पटकन लगेच होऊ शकतात. उदाहरणार्थ दातांचे क्लिनिंग अर्थात सफाई, किंवा दात भरणे म्हणजे फिलिंग वगैरे..

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग

 

 

ही म्हण तर आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे ; पण दातांच्या दवाखान्यात पण अशा काही उतावळ्या नवर्‍यांचे अनुभव मला आलेले आहेत.
उद्या मुलगी बघायला येणार आहे म्हणून किंवा परवा साखरपुडा आहे म्हणून समोरचे नसलेले दात लगेच बसवून हवेत म्हणून भावी नवरदेव आले होते ; पण दुर्दैवाने “एवढ्या पटकन एका दिवसात दात देणे शक्य नसल्यामुळे शक्य असल्यास नंतर या” असे त्यांना सांगावे लागले.
अजून एक तरुण एकदा क्लिनिकमध्ये आल्याचं मला आठवतंय, ‘उद्या मुलगी बघायला येणार आहे’ म्हणून त्याला लगेच दातांचा क्लिनिंग करून हवं होतं (म्हणजे भावी बायकोला त्याच्या गुटखा, तंबाखू खाण्याच्या सवयीची कल्पना दातांच्या डागांवरून येऊ नये)
हे शक्य असल्यामुळे त्याला लगेच क्लीनिंग करून देता आलं.

नवरेच घाईत असतात असं नाही तर भावी नवऱ्या मुलींनाही ही लग्नामध्ये आपण सगळ्यात सुंदर दिसावं असं वाटतं व आपलं स्माईल खुलवण्यासाठी समोरच्या दातांची कॉस्मेटिक ट्रीटमेंट किंवा दात अधिक शुभ्र दिसण्यासाठी व्हाइटनिंग अशा ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. अशा ट्रीटमेंटसाठी नवऱ्या मुलीच्या घाईगडबडीच्या वेळापत्रकातून दाताच्या अपॉइंटमेंट साठी वेळ काढून ट्रीटमेंट संपवण्यात आमची कसरत होते

 

परदेसी बाबू

 

दुसरे घाईगडबडीत असणारे पेशंट म्हणजे परदेशात राहणारे अनिवासी भारतीय, जे केवळ काही दिवसांच्या सुट्टीसाठी भारतात आलेले असतात. परदेशात दातांचा इलाज खूप महाग असल्यामुळे त्यातल्या बऱ्याच जणांना इथे दातांची ट्रीटमेंट करून घ्यायची असते.
अशा पेशंटची निघण्याची तारीख, हातात असलेला वेळ हे सर्व बघून ट्रीटमेंटच्या तारखा ऍडजस्ट कराव्या लागतात आणि कधीकधी एखादी ट्रीटमेंट जर त्यांच्या निघण्याआधी संपणार नसेल तर तसं स्पष्ट सांगावं लागतं.
परदेशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी निघालेल्या तरुण- तरुणींची ट्रीटमेंट सुद्धा त्यांच्या घाईगडबडीतच्या या वेळापत्रकाचा विचार करून त्यांच्या निघण्याच्या तारखेआधी संपवावी लागते.
म्हणजे आम्हाला पण कॉर्पोरेट जगता सारखी डेडलाईन काही पेशंटच्या बाबतीत काटेकोरपणे पाळावी लागते म्हणा ना…
तर हे होतं घाई पुराण…

 

0 Comments