दातांच्या रंगांची दुनिया..
नुकतीच होळी व त्यानंतर धुळवड , रंगपंचमी साजरी झाली. हे सण म्हणजे रंगांची उधळण असते. निसर्गात देखील रंगांच्या विविध छटा पदोपदी दिसतात .तशाच दातांमध्ये पण वेगवेगळ्या छटा असतात… आता तुम्ही म्हणाल दातांमध्ये आणि छटा?
आकाशाचा निळा झाडांचा हिरवा तसा दातांचा रंग पांढरा शुभ्र…
पांढरे शुभ्र दात दातांच्या चांगल्या आरोग्याचे द्योतक मानले जातात. दातांमध्ये कसल्या आल्यात रंगछटा?
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दातांच्या या पांढऱ्या रंगाचे कमीत कमी 16 छटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे. दातांच्या रंगछटांचा अभ्यास हे स्वतंत्र विज्ञान आहे आणि त्यावर बराच अभ्यास झालेला आहे.त्यावर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.
एवढेच नाही तर एकाच व्यक्तीच्या सर्व दातांची रंगछटा सारखी नसते. एवढेच काय… तर एकाच दातामध्येसुद्धा एकच रंगछटा सगळीकडे नसते. दातांच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी रंगछटा असू शकते. व दातांचा रंग देखील वय किंवा बाकी बऱ्याच गोष्टींमुळे बदलू शकतो
कुठलीही कला म्हणजे गायन, नृत्य, चित्रकला, अभिनय या सर्वांमध्ये दुसऱ्याची नक्कल करणे किंवा कॉपी करणे हे कमीपणाचे मानले जाते; पण डेंटिस्ट्री मध्ये मात्र निसर्गाने दिलेल्या दातांची तंतोतंत नक्कल करून एखादे फिलिंग किंवा खोटे दात जर एखादा डेंटिस्ट किंवा टेक्निशियन देऊ शकत असेल तर त्यांचे कौशल्य खूप चांगले आहे असे मानले जाते. आणि यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे असते ते दातांची रंगछटा एकदम अचूक ओळखणे व ती तशीच्या तशी फिलिंग मध्ये किंवा कॅप किंवा खोट्या दातामध्ये उतरवणे आणि यामध्येच मदत होते दातांच्या रंगछटांच्या अभ्यासाची.. .
दातांची रंगछटा ठरवण्यासाठी पूर्वीपासून शेड गाईड ज्यात दातांच्या 16 रंगछटाचे नमुने असतात, ते वापरले जाते. हे शेड गाईड व डेंटिस्टची अनुभवी नजर या दोन गोष्टींचा उपयोग करून पूर्वीपासून दातांची शेड ठरवली जायची.
यात आता कालानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा प्रवेश झालेला आहे. ज्या दातांचे फोटोग्राफ्स घेणे किंवा digital शेड गाईडचा वापर याचा समावेश होतो.

0 Comments