धडपड आणि दात भाग-२

by | Oct 7, 2022

   मागच्या धडपण आणि दात या भागात आपण पडल्यानंतर दात तुटला किंवा दुर्दैवाने काढायला लागला तर काय काय पर्याय उपलब्ध आहेत हे पाहिले.
एकदा आमच्या डेंटल कॉलेजमध्ये एक अकरा वर्षाचा मुलगा आला होता . त्याचा समोरचा दात नव्हता व त्याला तो बसून हवा होता. एवढ्या लहान वयात समोरचा कसा काय नाहीये म्हणून मी “तो दात काढून घेतला का? की आलाच नाही?” असं विचारलं.
त्यावर तो मुलगा म्हणाला की,” एकदा खेळताना मी पडलो आणि तो अख्खा दात मुळासकट दात निघून बाहेर आला”
मग मी विचारलं , “मग तू काय केलंस?”
तर तो मुलगा म्हणाला की, “फेकून दिला दात अणि परत खेळायला लागलो.”
 
दुर्दैवाने त्या मुलाला हे माहीत नव्हते की असा दात सांभाळून ठेवला तर तो परत त्याच्या जागी बसवता येतो त्यामुळे आता त्या आता मुलाला ; त्याचे वय लक्षात घेऊन त्याला साजेसा पर्याय निवडून तो दात बसवावा लागणार होता . 

 

साधारण 6 ते 14 वर्षांच्या  लहान मुलांमधे खेळताना पडण्याच्या घटना  बऱ्याचदा घडतात.

 या वयात जबड्याचे हाड लवचिक असते;  तसेच पक्क्या दातांची मुळे अजून बनत असतात अशा मुलांमध्ये पडल्यानंतर कधीतरी अख्खा दातच हातात निघून येणे किंवा मार लागल्यानंतर  दात त्याच्या जागेवरून हलून आत किंवा बाहेर येणे अशा घटना पण घडतात

 

जर खेळताना असा काही दात अख्खा निघून आला आणि जर दात स्वच्छ असेल तर शक्यतो तो दात त्याच्या खोबणीत  परत बसवायचा असतो, त्याच्या मुळाला अजिबात स्पर्श न करता . 

जर दात अस्वच्छ असेल, मातीत वगैरे पडला असेल तर हलकेच धुवून तेही मुळाला स्पर्श न करता ,परत खोबणीत बसवायचा प्रयत्न करायचा असतो.
जर काही कारणाने दात खोबणीत  बसत नसेल किंवा बसवायला जमत नसेल तर तो दात थोड्याशा दुधात सांभाळून ठेवून लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या तासामध्ये शक्यतो डेंटिस्ट कडे जाणे गरजेचे असते.
 दूध सुद्धा उपलब्ध नसेल तर त्या मुलाच्या स्वतःच्या लाळेमध्ये म्हणजे हिरड्या जवळ किंवा गाल आणि हिरड्यांच्या मध्ये दात सांभाळून ठेवता येऊ शकतो.
 असा मुलगा आणि तो सांभाळून ठेवलेला दात लवकरात लवकर डेंटिस्ट कडे पोहोचले तर तो दात त्याच्या जागी परत लावून तो दात वाचण्याची शक्यता जास्त असते.
तो दात जागेवरून हलला आहे असे वाटत असेल, तरी देखील लवकरात लवकर डेंटिस्टकडे जाणे गरजेचे असते. त्यावेळी शक्य असतील ते उपचार लगेच करून दुखण्यामध्ये आराम देऊ शकतात तसेच त्या दातांच्या बाबतीत पुढे काय ट्रीटमेंट करायचे ते देखील प्लॅन करता येते
यात दात ढिले झाले असतील,  तर  बांधून ठेवणे , गरज असेल तर नसांचा इलाज किंवा मग गरज असल्यास तारांच्या ट्रीटमेंटचा सल्ला देऊ शकतात.

 

0 Comments