धोकादायक गुटखा
काना मागून आला आणि किलर झाला….
भारतामध्ये तंबाखू आणि सुपारी या गोष्टींचा सेवन करणे ही पद्धत बऱ्याच शतकांपासून सुरू आहे; मग ते हुक्का च्या स्वरूपात असू दे किंवा पानाच्या स्वरूपात …तंबाखू आणि सुपारीचे दुष्परिणाम लक्षात यायला लागल्यावर विसाव्या शतकात त्याबद्दल बरीच जनजागृती झाली. सिगरेट आणि तंबाखू बद्दल बऱ्यापैकी जनमत तयार होत असताना , साधारण 30 वर्षांपूर्वी तंबाखूच्या छोट्या भावाचा जन्म झाला . त्याचे नाव “गुटखा”…. ज्यात तंबाखू सोबत वेगवेगळे घटक नशा वाढवण्यासाठी घातलेले असतात. गुटखा रेडिमेड छोट्या पॅकेटमध्ये उपलब्ध असल्यामुळे व पटकन कुठेही नेण्यासारखा असल्यामुळे लवकरच लोकप्रिय झाला. तंबाखू मध्ये धोकादायक आणि नशा निर्माण करणारे निकोटीन हे द्रव्य असतं मात्र गुटख्यामध्ये मात्र हजारो धोकादायक रसायने असतात; ज्यापैकी 28 कॅन्सरला कारणीभूत ठरणारी असतात…
गुटखा -तंबाखू खाणाऱ्यांमध्ये कॅन्सर होण्याची शक्यता 400 पटीने वाढते .
थोडक्यात काय, तर तंबाखूचा छोटा भाऊ उशिराने मार्केटमध्ये आलेला असला तरी तो “कॅन्सर आणि आत्महत्याची रेसिपी” आहे .
अगदी पंधराव्या सोळाव्या वर्षापासूनच्या मुलांमध्ये गुटख्याचे व्यसन खूप प्रमाणात आहे.
व्यसनाची सुरुवात ही जरी मजा म्हणून किंवा वाईट संगतीमुळे होत असली तरी शेवटी पुढे त्याचे परिणाम धोकादायकच असतात आणि त्यात आता भर पडलेली आहे जाहिरातींची ….
मुले ज्यांना आदर्श मानतात, असे क्रिकेटर्स आणि चित्रपट सृष्टीतले मोठे हिरोज माऊथ फ्रेशनर किंवा तत्सम नावाआड लपलेल्या गुटख्याची जाहिरात करतात. आपल्या लाडक्या स्टारची प्रत्येक गोष्ट कॉपी करणारे त्याचे फॅन्स मग ह्या गोष्टीही कॉपी करतात …
क्रिस्तियानो रोनाल्डो भर पत्रकार परिषदेत कोकची बाटली बाजूला करण्याची हिम्मत दाखवू शकतो.
सचिन तेंडुलकरने सुद्धा काही झालं तरी सिगरेट किंवा तंबाखू जन्य पदार्थांची जाहिरात करणार नाही हे तत्व पूर्ण कारकीर्दभर पाळलं म्हणूनच हे लोक आदरासाठी पात्र आहेत.
गुटखा बंदी असूनही राजरोसपणे कसा मिळतो याकडे सरकारने देखील लक्ष देण्याची गरज आहे आणि सेलिब्रेटींनी पण “आपल्या लोकप्रियतेचा उपयोग व्यसनांचा प्रचार करण्यासाठी करायचा का?” हा विचार करण्याची गरज आहे…
|
ReplyForward
|

0 Comments