शिक्षक दिन
आज शिक्षक दिन…
शाळा, कॉलेज व त्यानंतर मी अटेंड केलेल्या कोर्सेस च्या शिक्षकांकडून मी भरपूर शिकले व अजूनही शिकते आहे व त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
पण बारावीतले आमचे एक सर आम्हाला म्हणायचे की , “पेशंट हा डॉक्टरचा सगळ्यात मोठा शिक्षक असतो, त्यामुळे जास्तीत जास्त पेशंट एक्सपोजर मिळेल अशाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या” आणि मग डेंटिस्ट होत असताना आणि नंतरही या गोष्टीचा पुरेपूर प्रत्यय आला.
पाचही बोटं सारखी नसतात, तसेच कुठल्याही दोन पेशंटचे दातही सारखे नसतात ; एवढेच काय तर एका पेशंटच्या दातांमध्ये पण विविधता असते त्यामुळे दात, त्यांच्या समस्या व त्यांची ट्रीटमेंट यांच्यातलं वैविध्य शिकता आलं.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच ; त्यामुळे पेशंटकडून दातांबद्दलच नाही पण मानवी स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल पण शिकता आले.
“काय भुललासी वरलिया रंगा ” असं मराठीत म्हटलेलं आहे त्या नात्याने पेशंटकडे पाहून आपण बांधलेला अंदाज कधी कधी कसा चुकीचा ठरू शकतो हे देखील अनुभवले.
एवढेच काय तर व्यवहारात ज्ञानाबद्दलही धडे मिळाले (म्हणजे कोणी वेळेआधीच पैसे देणार तर कोणी गोड बोलून पैसे देणे पुढे ढकलणार आणि असं बरंच काही)
वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या जाती धर्मातील,आर्थिक स्तरातील मला शिकून जाणाऱ्या सर्व पेशंटचे या शिक्षक दिनानिमित्त आभार…

0 Comments